राज्यात वादळी वाऱ्यांची एंट्री…! पुण्यासह २२ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Rain Updates : मान्सूनला पुढे जाण्यासाठी अनुकूल असलेल्या प्रवाहांचा जोर कमी झाल्याने मान्सून गेला आठवडाभर एकाच जागेवर आहे. राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. दरम्यान, पावसाला अनुकूल वातावरण असल्यामुळे राज्याच्या काही भागात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील मान्सून मुंबई, अहिल्यानगर, बीड, नदिड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोहोचलेला असून सध्या याच भागात त्याचा मुक्काम आहे. मान्सूनची सीमा मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट या भागात कायम आहे.
गुरुवारी कोल्हापूर येथे २७ मि.मी., तर नाशिक येथे १६, सातारा येथे १४ मि.मी. इतका पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर येथे ४ मि.मी. पावसाची नोंद झाली. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या भागात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे. Maharashtra Rain Updates |
‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
तसेच मराठवाड्यातील धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तापमानात बदल होत आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान नागपूर येथे ३९ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १६.१ अंश सेल्सिअस होते. Rain Updates |





