नाशिक : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील असलेली १८०० झाडे तोडून तेथे साधुग्राम उभारण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर या वृक्षतोडीला जोरदार विरोध केला जात आहे. नाशिकमधूनच नव्हे, तर राज्यभरातून निसर्गप्रेमी, अभिनेते, नागरिक यांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. अखेर या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ही झाडे तोडण्यास राष्ट्रीय हरिद लवादाने काही काळासाठी अंतरिम स्थगिती दिली असल्याची माहिती याचिकाकर्ते वकिल श्रीराम पिंगळे यांनी सांगितले. हरित लवादाने दिलेल्या अंतरिम स्थगितीविषयी माहिती देताना पिंगळे म्हणाले की, “हरित लवादाने अंतरिम आदेश दिला आहे. हा अंतिम निकाल नाही. आम्ही अंतरिम आदेशाची विनंती केली होती, कारण कोणतीही प्रक्रिया न राबवता प्रक्रिया राबवल्याचे दाखवून वृक्षतोडीचा घाट घातला गेला होता. तो मोडीत काढण्याचा आमचा प्रयत्न होता. कायदेशीर प्रक्रिया व्हावी आणि त्यानंतर आवश्यकता असेल तरच वृक्षतोड व्हावी या अपेक्षेने आम्ही हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. पुढच्या सुनावणीची तारीख १५ जानेवारी दिली आहे. तोपर्यंत वृक्षतोडीवर – स्थगिती आहे. तोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल का हा प्रश्न आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा अंतरिम आदेश आहे,” असे पिंगळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.