बारामती तालुक्यात बेकायदेशीर व्यवसाय बंद दाखवा आणि १ लाख १ हजार रूपयाचे बक्षिस मिळवा…

डोर्लेवाडी – बारामती तालुक्यातील ९९ गावे आणि १ नगरपालिका हद्दीमध्ये बेकायदेशीर व्यवसाय बंद असल्याची बारा गावे दाखवावीत आणि १ लाख १ हजार रूपयाचे बक्षिस मिळवावे असे खुले आव्हान बारामती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष नेवसे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, बारामतीच्या खासदार, पुणे जिल्हाधिकारी, पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक पुणे, बारामती प्रांताधिकारी यांना लेखी पत्रव्यवहार करून करण्यात आला आहे.
बारामती शहर आणि तालुक्यातील बेकायदेशीर अवैध धंदे बंद करण्यासाठी वारंवार चार वर्षापासून पाठपुरावा करीत आहोत मात्र या बेकायदेशीर व्यवसायावर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात कारवाई होते. विसरी पडताच पुन्हा हे बेकायदेशीर व्यवसाय जोमाने सुरू होतात. हे व्यवसाय कोणाच्या पाठिंब्याने सुरू होतात याची चौकशी झाली पाहिजे. यासाठीच आता आम्ही थेट राज्याचे मुख्यमंत्री यांना २५ एप्रिल २०२३ रोजी लेखी पत्रव्यवहार करून बारामती शहर आणि तालुक्यातील ९९ गावे आणि १ नगरपालिका हद्दीतील बारा गावे बेकायदेशीर व्यवसाय बंद असल्याचे दाखवा आणि एक लाख एक हजाराचे बक्षीस मिळवा असं खुलं आवाहन केले आहे.
बारामती तालुक्यात बेकायदेशीर केमिकलयुक्त विषारी ताडी, हातभट्टी व इंग्लीश डुप्लीकेट दारू मोठ्या प्रमाणात राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या सहकार्याने बेकायदेशीर राजरोजपणे, आणि खुलेआम सुरू आहेत. विषारी ताडी आणि डुप्लीकेट दारूचे सेवन करून आत्तापर्यन्त हजारो तरुणांचे जीव गेले आहेत. यामुळे अनेक जणांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोष नेवसे, जगदीश देवकाते, रमेश मोरे, संतोष आटोळे, शोभा घनवट, पुनम नेवसे यांनी लेखी पत्रव्यवहार केला आहे. बारामती तालुक्यात राजरोजपने सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय कायमस्वरूपी बंद व्हावेत हे व्यवसाय बंद न झाल्यास सर्व तालुक्यातील महिला व पुरूष आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पत्रव्यवहार केलेल्या सामाजिक कार्यकर्त्याकडून देण्यात आला आहे. यामुळे राज्यकर्ते, राज्य उत्पादन शुल्क आणि संबंधित बारामती तालुक्यातील अधिकारी यावर ठोस काय उपाययोजना करणार हे पहावे लागणार आहे.





