Monika Rajale : पाथर्डीच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी संपन्न झाली. आरोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे वाटप अशा अनेक गोष्टींमुळे यंदाची निवडणूक गाजली. मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर येत होते. यादरम्यान अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाथर्डीच्या आमदार आणि भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्यात आली.
मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रकार सायंकाळी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील मतदान केंद्रावर झाला. तर आक्रमक जमावापासून बचाव व्हावा म्हणून राजळे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतःला मतदानकेंद्राच्या खोलीत कोंडून घेतले. उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत दोन तास मतदानकेंद्रात बसून असलेल्या राजळे यांची सुटका केली तर या घटनेने संतप्त झालेल्या हजारो राजळे समर्थकांनी रात्री शहरातील माणिक दौंडी चौकात रास्तारोको आंदोलन सुरु केले.
यामुळे काही काळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेत राजळे आणि त्यांचे चार समर्थक किरकोळ जखमी झाले आहे. या प्रकरणी मात्र राजळे यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने या संदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आली नव्हती.





