मुंबईत पोलिसांवर दगडफेक

Stone pelting on police in Mumbai – येथील पवई येथे भीमनगर परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना जमावाकडून पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचा व्हिडिओ देखील समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
पवईतील हिरानंदानी भागात अनेक वर्ष जुनी झोपडपट्टी आहे. या झोपडीधारकांना पालिकेने नोटीस दिली होती. गुरूवारी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी अनधिकृतरित्या वसलेली ही झोपडपट्टी हटवण्यासाठी कारवाई सुरू केली. त्यावेळी तथे मोठ्या प्रमाणात पोलिसही उपस्थित होते.
पण या कारवाईमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांवरती आणि पालिका अधिकाऱ्यांवरती थेट दगडांचा मारा करण्यास सुरूवात केली. यामुळे तेथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि वातावरणही तापले. त्यानंतर पोलिसांनीही थोडाफार लाठीचार्ज केला असून सध्या या भागात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांची एक टीम या कारवाईवेळी उपस्थित होती. पण जमावाने कारवाईला विरोध करत अचानक दगडफेकीला सुरुवात केली. यात काही पोलिस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी आता तणावाचे वातावरण आहे.





