Stock market : ‘या’ कारणामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरला; सेन्सेक्स 142 अंकांनी खाली
Stock market : सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांत मोठी घसरण झाली. दुसरीकडे पॉवर ग्रिड, इटर्नल, एनटीपीसी आणि टाटा स्टील यांच्या समभागांनी वाढ नोंदवली.

Stock market : पश्चिम आशियातील भू-राजकीय घडामोडींमुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली. ऊर्जा आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांवरील विक्रीमुळे सेन्सेक्स १४१.९० अंकांनी घसरून ७५,८६७.८० वर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही किरकोळ ६.५५ अंकांनी घसरून २३,९०७.१५ वर स्थिरावला. दिवसभर बाजारात मोठी चढ-उताराची स्थिती दिसून आली. सेन्सेक्सने एका टप्प्यावर ७६,२२४.६८ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला, तर दिवसातील नीचांकी स्तर ७५,७४८.२१ इतका होता. (Stock market )
या शेअर्समध्ये घसरण – (Stock market)
सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांत मोठी घसरण झाली. दुसरीकडे पॉवर ग्रिड, इटर्नल, एनटीपीसी आणि टाटा स्टील यांच्या समभागांनी वाढ नोंदवली.
जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत ३.२४ टक्क्यांची घसरण होत ते प्रति बॅरल ९६.३५ डॉलरवर आले. अमेरिके-इराण चर्चेबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याने बाजारातील घसरण काही प्रमाणात मर्यादित राहिली. मात्र ठोस तोडगा न निघाल्याने गुंतवणूकदार सावध भूमिकेत राहिल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्केई निर्देशांक वाढीसह बंद झाले, तर चीनचा शांघाय कॉम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक घसरले. युरोपीय बाजारांमध्ये मात्र सकारात्मक वातावरण दिसून आले. (Stock market )
दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारी भारतीय बाजारातून २,४०७.८७ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतल्याची माहिती समोर आली.






