शेअर बाजारातील तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 153 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे ₹2.35 लाख कोटींचे नुकसान

मुंबई – सलग चार दिवसांच्या तेजीला आज भारतीय शेअर बाजारात ब्रेक लागला. गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिल्याने बाजार घसरणीने बंद झाला. सेन्सेक्स 153.09 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 81,773.66 वर तर निफ्टी 62.15 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी घसरून 25,046.15 वर बंद झाला.
दिवसभर बाजारात चढ-उतार सुरू राहिले. आयटी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये खरेदीमुळे निफ्टीने एकवेळ 25,200 चा टप्पा गाठला होता. मात्र, दुपारनंतर विक्रीचा जोर वाढल्याने बाजाराने सर्व वाढ परत गमावली आणि सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून तब्बल 500 अंकांनी घसरला.
सेक्टोरल कामगिरी –
आज केवळ आयटी (1.5%) आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स (0.7%) या दोनच क्षेत्रांत तेजी दिसली. उर्वरित सर्व क्षेत्रे लाल निशाणात बंद झाली. रिअल्टी, टेलिकॉम, फार्मा, तेल व वायू, मीडिया, सार्वजनिक बँका आणि ऑटो क्षेत्रात 0.3% ते 2% दरम्यान घसरण नोंदवली गेली.
₹2.35 लाख कोटींचे मार्केट कॅप गमावले –
बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल (मार्केट कॅप) आज 457.88 लाख कोटी रुपयांवर आले. सोमवारी हे भांडवल 460.23 लाख कोटी रुपये होते. त्यामुळे आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ₹2.35 लाख कोटींची घसरण झाली आहे.
सेन्सेक्समधील वाढणारे शेअर्स –
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 9 शेअर्स हिरव्या निशाणात बंद झाले. यात टायटन कंपनी लिमिटेडचा शेअर सर्वाधिक 4.38% वाढीसह अव्वल राहिला. त्याचबरोबर इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये 1.17% ते 2.67% पर्यंत वाढ झाली.
घसरणीतील प्रमुख शेअर्स –
सेन्सेक्समधील 21 शेअर्स लाल निशाणात बंद झाले. टाटा मोटर्सचा शेअर 2.41% घसरून सर्वाधिक तोट्यात राहिला. त्याचप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्रा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि ट्रेंट यांच्या शेअर्समध्ये 1.46% ते 1.91% इतकी घसरण झाली.
एकूण बाजार स्थिती –
बीएसईवर आज एकूण 4,330 शेअर्समध्ये व्यवहार झाला. यापैकी 1,740 शेअर्स वाढीसह, तर 2,435 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 155 शेअर्स सपाट राहिले. आज 161 शेअर्सनी आपला 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर 144 शेअर्सनी नव्या 52 आठवड्यांच्या नीचांकाला स्पर्श केला.





