Stock Market : ‘या’ कारणामुळे शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी घसरला; सेन्सेक्स 417 अंकांनी आपटला
Stock Market : शेअर बाजारातील घसरण सलग चौथ्या दिवशी कायम. सेन्सेक्स 417 अंकांनी घसरून 76,152 वर, तर निफ्टी 23,873 वर बंद; कच्चे तेल आणि आयटी शेअर्सचा दबाव.

Stock Market : भारतीय शेअर बाजारातील घसरणीचे सत्र सलग चौथ्या दिवशीही कायम राहिले. गुरुवारी (3 सप्टेंबर) सेन्सेक्स 417 अंकांनी घसरला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर दबाव आला. दिवसाच्या अखेरीस नफा-वसुलीमुळे बाजारातील घसरण आणखी वाढली.
बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 417.49 अंकांनी म्हणजेच 0.55 टक्क्यांनी घसरून 76,152.86 अंकांवर बंद झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स मजबूत होता. तो 354.13 अंकांनी म्हणजेच 0.46 टक्क्यांनी वाढून 76,924.48 अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, शेवटच्या सत्रात झालेल्या विक्रीमुळे ही वाढ पूर्णपणे नाहीशी झाली.
एनएसईचा निफ्टी 41 अंकांनी म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घसरून 23,873.45 अंकांवर बंद झाला.
या शेअर्समध्ये मोठी घसरण –
सेन्सेक्समधील टायटन, ट्रेंट, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, सन फार्मास्युटिकल्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
दुसरीकडे, अॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि टाटा स्टील या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
कच्च्या तेलाच्या दराचा दबाव –
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला. ब्रेंट क्रूडचा दर 1.57 टक्क्यांनी वाढून 97.13 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला.
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या किमती उच्च पातळीवर कायम राहणे हा देशांतर्गत बाजारासाठी मोठा दबाव आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून नव्याने झालेली खरेदी यांना भू-राजकीय तणाव आणि वाढलेल्या जागतिक रोख्यांच्या परताव्यामुळे मर्यादा आल्या.
त्यांच्या मते, बँकिंग आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्सने बाजाराला काहीसा आधार दिला. तसेच स्मॉल-कॅप शेअर्समध्येही गुंतवणूकदारांचा रस दिसून आला. यामागे देशांतर्गत आर्थिक वाढीच्या शक्यतांवरील विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले.
आशियाई बाजारांचे मिश्र चित्र –
आशियाई बाजारांमध्येही संमिश्र स्थिती राहिली. हँग सेंग आणि निक्केई 225 घसरले, तर शांघायचा एसएसई कम्पोझिट निर्देशांक जवळपास स्थिर राहिला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक मात्र वाढीसह बंद झाला. युरोपीय बाजार घसरणीसह व्यवहार करत होते. अमेरिकेतील बाजार बुधवारी रात्रीच्या व्यवहारात वाढीसह बंद झाले होते.
दरम्यान, एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) 6,688.37 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) देखील 2,812.98 कोटी रुपयांची खरेदी केली.
बुधवारी सेन्सेक्स 373.93 अंकांनी घसरून 76,570.35 अंकांवर, तर निफ्टी 141.35 अंकांनी घसरून 23,914.45 अंकांवर बंद झाला होता. त्यावेळी बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरला होता.





