Stock Market News : शेअर निर्देशांकांची घोडदौड चालूच, दोन दिवसांत कंपन्यांच्या बाजार मूल्यात वाढ….

मुंबई – महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे. त्यामुळे केंद्र सरकार स्थिर झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार आर्थिक सुधारणा जारी ठेवू शकेल, या भावनेने गेल्या दोन कामकाजाच्या दिवसात शेअर बाजार निर्देशांकात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या दोन दिवसात शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य 14.20 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.
सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 992 अंकांनी म्हणजे 1.25 टक्क्यांनी वाढून 80,109 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 314 अंकांनी म्हणजे 1.32 टक्क्यांनी वाढून 24,221 अंकावर बंद झाला. तर गेल्या दोन दिवसात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स चार टक्क्यांनी म्हणजे 2,954 अंकांनी वाढला आहे. यामुळे कंपन्यांचे बाजार मूल्य या दोन दिवसात 14.20 लाख कोटी रुपयांनी वाढून 439 लाख कोटी रुपये म्हणजे 5.22 लाख कोटी डॉलर इतके झाले आहे. आता सेन्सेक्स पुन्हा 80 हजार अंकाच्या वर गेल्याबद्दल ब्रोकर्सनी समाधान व्यक्त केले.
मेहता सिक्युरीटीज या संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी सांगितले की, आता केंद्र सरकार स्थिर झाल्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन तिमाहीत विकासदर कमी होणार आहे. त्यामुळे उरलेल्या 2 तिमाहित विकासदर वाढविण्यासाठी केंद्र सरकार खर्च करू शकणार आहे.
वाढीव विकासदरासाठी किमती स्थिर असणे अत्यावश्यक – शक्तीकांत दास
गेल्या दोन दिवसात झालेल्या खरेदीचा फायदा एल अँड टी, स्टेट बँक, अदानी पोर्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, पावर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक या कंपन्यांना झाला. तर जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, इन्फोसिस, मारुती, एशियन पेंट्स, एचसीएल टेक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. मुंबई शेअर बाजाराचा स्मॉल कॅप 1.86 टक्क्यांनी, तर मिड कॅप 1.61 टक्क्यांनी वाढला. भांडवली वस्तू, तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा, बांधकाम, बँकिंग, वित्तीय सेवा, आरोग्य या क्षेत्राचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले.





