वाढीव विकासदरासाठी किमती स्थिर असणे अत्यावश्यक – शक्तीकांत दास

मुंबई – किरकोळ आणि घाऊक किमतीवर आधारित महागाई निर्देशांक सध्या जास्त पातळीवर आहे. मात्र विकास दराला चालना देण्यासाठी व्याजदर कपात आवश्यक असल्याचे गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले होते. आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी विकासदर दीर्घ पल्ल्यात जास्त पातळीवर राहण्यासाठी किमती स्थिर असल्याची अपरिहार्यता व्यक्त केले आहे.
सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाईचा दर 4% च्या आत रोखण्यासाठी उपायोजना करण्यास सांगितलेले आहे. या सूचनेनुसार रिझर्व्ह बँक महागाई निर्देशांक 4% च्या आत कमी करण्याचा प्रयत्न जारी ठेवील असे दास यांनी चलनवाढ आणि विकासदर संतुलन या विषयावरील व्याख्यानात बोलताना सांगितले.
दास म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने महागाई कमी करण्यासाठी व्याजदर जास्त पातळीवर ठेवले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये भारतीय विकास दरावर जास्त परिणाम झालेला नाही. तो जवळपास 7 % इतका आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक महागाई कमी करण्यासाठी उपाय योजना करू शकत आहे. ते म्हणाले की किमती स्थिर असणे किंवा महागाईचा दर स्थिर असणे हे जनतेसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी योग्य असते. त्यामुळे दीर्घ पल्ल्यात विकासदर वाढण्याच्या शक्यता खुल्या होतात. त्यामुळे जनतेची क्रयशक्ती वाढते. गुंतवणुकीसाठी पूरक वातावरण निर्माण होते.
दक्षिण गोलार्धातील रिझर्व्ह बँकांच्या प्रमुखासमोर बोलताना त्यांनी सांगितले की, रिझव्हर्र् बँकेने केलेल्या उपाययोजनामुळे भारतातील महागाई मर्यादित राहण्यास यश मिळाले आहे. एप्रिल 2023 अगोदर भारतातील महागाई हाताबाहेर चालण्यात जाण्याची लक्षणे दिसून येत होती. मग त्यामुळे रिझर्व्ह बँकेने विविध टप्प्यात रिझव्हर्र् बँकेचा मुख्य व्याजदर म्हणजे रेपो दर अडीच टक्क्यांनी वाढविला होता.
त्यानंतर व्याजदर वाढ थांबविण्यात आलेली आहे. या कालावधीत व्याजदर कपातही करण्यात आलेली नाही.
एकूण परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतलेला आहे. दरम्यानच्या काळात परिस्थिती सुधारली असती तर व्याजदर कपातीची शक्यता खुली ठेवण्यात आली होती. केवळ एका महिन्यात महागाई 4% इतकी कमी होणे गरजेचे नाही तर अनेक महिने महागाई या पातळीच्या खाली राहणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षात देशातील आणि परदेशातील परिस्थिती अनिश्चित होती. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेसह जगातील इतर रिझव्हर्र् बँकांनाही अनेक संकटाचा सामना करावा लागला. मात्र यातून आपण यशस्वीरित्या वाटचाल करीत आहोत.



