Stock Market : ‘या’ कारणामुळे शेअर बाजाराला सलग तिसऱ्या दिवशी धक्का; सेन्सेक्स 374 अंकांनी घसरला
Stock Market : पश्चिम आशियातील संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा भारतीय शेअर बाजाराला फटका. सेन्सेक्स 374 अंकांनी घसरून 76,570 वर, तर निफ्टी 23,914 वर बंद.

Stock Market : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये निर्माण झालेली अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे.
बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्समध्ये जवळपास 374 अंकांची घसरण झाली, तर निफ्टी 24 हजारांच्या खाली आला आहे. (Stock Market)
30 कंपन्यांचा बीएसई सेन्सेक्स 373.93 अंकांनी म्हणजेच 0.49 टक्क्यांनी घसरून 76,570.35 अंकांवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्स 808.56 अंकांनी घसरून 76,135.72 अंकांपर्यंत खाली आला होता.
50 कंपन्यांचा एनएसई निफ्टी 141.35 अंकांनी म्हणजेच 0.59 टक्क्यांनी घसरून 23,914.45 अंकांवर स्थिरावला.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एचसीएल टेक, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फोसिस यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. दुसरीकडे अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, एनटीपीसी आणि टायटन यांचे समभाग वाढीसह बंद झाले.
गुंतवणूकदारांचे ₹2.76 लाख कोटींचे नुकसान – (Stock Market)
एका कामकाजाच्या दिवसापूर्वी म्हणजेच 01 सप्टेंबर 2026 रोजी बीएसईवर (BSE) लिस्टेड असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप ₹4,89,41,989.64 कोटी होते. आज म्हणजेच 02 सप्टेंबर 2026 रोजी हे घसरून ₹4,86,65,456.58 कोटींवर आले आहे. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात ₹2,76,533.06 कोटींची घट झाली आहे.
कच्चे तेल 95 डॉलरवर – (Stock Market)
पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाल्याने ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला. ब्रेंट क्रूडचा दर 0.40 टक्क्यांनी वाढून 95.13 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला.
एनरिच मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनमुडी आर. यांच्या मते, अमेरिका-इराणमधील नव्याने वाढलेल्या संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली असून, होर्मुझ सामुद्रधुनी लवकर खुली होण्याच्या अपेक्षांनाही धक्का बसला आहे. वाढते कच्चे तेलाचे दर आणि जागतिक रोखे उत्पन्नातील वाढ यामुळे गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता कमी झाली असून बाजारात ‘रिस्क-ऑफ’ वातावरण राहिले.
जागतिक बाजारही दबावात –
आशियाई बाजारांमध्येही मोठी घसरण झाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी 3.99 टक्के आणि जपानचा निक्केई 225 निर्देशांक 2.85 टक्क्यांनी घसरला. शांघायचा एसएसई कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. युरोपीय बाजार नकारात्मक पातळीवर व्यवहार करत होते. अमेरिकेतील बाजारही मंगळवारी घसरणीसह बंद झाले.
दरम्यान, मंगळवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) 1,143.38 कोटी रुपयांच्या भारतीय समभागांची खरेदी केली. मंगळवारी सेन्सेक्स 12.99 अंकांनी घसरून 76,944.28 अंकांवर, तर निफ्टी 24.60 अंकांनी घसरून 24,055.80 अंकांवर बंद झाला होता.






