पुणे जिल्हा | उजनीतील साठा 35 टक्क्यांवर

पळसदेव, (वार्ताहर)- 25 जुलैच्या पावसानंतर उजनी धरण पाण्याची झपाट्याने वाढ होत असून गेली तीन दिवसांत उजन धरण मायनस साठ्या वरून आज 35 टक्क्यांवर ळभरले आहे. आज सकाळी आठ वाजलेल्या आकडेवारी पाहता धरण 35.44 टक्के भरले असून उपयुक्त पारणीसाठी 15 टीएमसी आहे.
उजनीच्या पाण्यातून शेतातील पिकाची तहान भागविण्यासाठी बळीराजाची गेल्या चार -पाच महिन्यांपासून सुरु असलेली धडपड आजही कायम होती. फरक मात्र एवढाच होता, आज पिकाच्या पाण्यासाठी नव्हे तर पाणी देणार्या विद्युतपंपाच्या सुरक्षिततेसाठी कसरत सुरू होती.
उजनीच्या पाण्यात झपाट्याने वाढ झाल्याने चारीवरील विद्युतपंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी एकमेकांची झालेली सांगड, अंगातून घामाच्या धारा व चारी भरल्यामुळे डोळ्यात तरळलेले आनंदाश्रू अशा संमिश्र स्थितीतील शेतकरी पळसदेव येथील उजनीच्या बॅकवॉटरवर आढळून आले. उजनीत पाणीसाठा वाढत असल्याने नदीकाठावर विद्युत पंप केबल जमा करण्याची लगबग सुरु आहे.
गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकर्यांना करावा लागला. उजनी धरण केवळ 60 टक्के भरले गेले व यातच सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून पाणी सोडल्याने मे महिन्याच्या सुरवातीला धरण रिकामे झाले. धरणातील पाणी पातळी उणे 60 टक्क्यांखाली गेल्याने शेतकर्यांच्या शेतीपंपाचे फुटवॉल्व्ह उघडे पडले होते.
यावेळी शेतकर्यांची पाणी मिळविण्यासाठी सुरु झालेली कसरत आजतागायत थांबली नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापूर्वी पाणी मिळविण्यासाठी सुरू असलेली धडपड आज पाण्यापासून विद्युतपंप हलविण्यापर्यंत सुरू आहे.
40 हून अधिक कारखाने अवलंबून
उजनी धरणाच्या जीवावर सुमारे चाळीसहून अधिक साखर कारखाने अवलंबून आहेत. तर उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 30 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर ऊसाची लागवड केली जाते. सध्या उजनीत पाणीसाठा वाढल्याने आता बळीराजा जोमाने उसाच्या लागवडीकडे वळला आहे. आता ऊस लागवड वाढल्याने लागवड करण्याची मजुरीचा खर्च देखील वाढला आहे.
ऊस लागवडीला प्राधान्य
जून महिन्याच्या सुरवातीला झालेल्या काही पावसांमुळे उजनीतील पाणी पातळीत संथ गतीने वाढ झाली होती. यामुळे शेतकर्यांनी ऊसाच्या लागवडीला प्राधान्य दिले. मात्र नंतर पावसाने ब्रेक घेतल्याने उस लागवडीचे काम शेतकर्यांनी थांबविले.
धरण भरेल का नाही, याची शाश्वती नसल्याने शेतकर्यांनी काही दिवस थांबण्याचा पर्याय निवडला. मात्र पुण्यासह घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे उजनीच्या पाणी पातळीत कमालाची वाढ झाली आहे. मायनसमध्ये असलेली धरणातील पाणी पातळी उपयुक्त साठ्यातील 35 टक्क्यांवर पोचली आहे.
यंदाचा उन्हाळा शेतकर्यांसाठी खूप त्रासदायक ठरला. धरणातील पाणी मिळविण्यासाठी शेतकर्यांनी लाखोंचा चुराडा केला. यातच रात्रीचा दिवस करुन सतत चारीवर धडपडणारा शेतकरी आतापर्यंत शांत झालेला नाही. शेती व्यवसायात कष्टाला पर्याय नाही हे या शेतकर्यांच्या अवस्थेवरुन सिध्द होत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी कोरड्या चारीकडे हताश होवून पाहणार्या शेतकर्यांच्या डोळ्यात पाण्याने तुडूंब भरलेली चारी पाहून आनंदाश्रू आले आहेत. -गणेश काळे, शेतकरी





