सचिन आणि स्टिव्ह वॉ सर्वोत्तम – शेन वॉर्न

मास्टर जिंकून देतो तर, वॉ वाचवतो
मेलबर्न – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ हेच जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न याने व्यक्त केले आहे. सामना जिंकायचा असेल तर सचिनच संघात हवा मात्र, सामना वाचवायचा असेल तर स्टिव्ह वॉ संघात हवा असेही वॉर्नने सांगितले.
आधूनिक क्रिकेटचा जनक म्हणुन मी सचिनलाच पसंती देईन. संघाला मोठी धावसंख्या गाठायची असेल तर सचिनच विजय मिळवून देईल आणि एखादा सामना अखेरच्या दिवशीच वाचवायचा असेल तर मात्र स्टिव्ह वॉ तो चमत्कार करु शकतो. अर्थात जर एखाद्या सामन्यात 400 पेक्षा जास्त धावसंख्येचा सामना जिंकण्यासाठी सचिनसह वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा हा देखील संघात आवश्यक आहे, असेही वॉर्नने सांगितले.
जगातील कोणत्याही मैदानावर, कोणत्याही गोलंदाजीसमोर आणि कोणत्याही परिस्थितीत समोरच्या संघावर वर्चस्व राखण्याचे कसब केवळ सचिनकडेच आहे. लारा देखील ही कामगिरी करु शकतो मात्र, पहिली पसंती सचिनलाच देईन. कसोटी तसेच एकदिवसीय सामने मिळून सचिनने 34 हजारांपेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. त्याची कामगिरीच त्याची महानता सिद्ध करते, असेही वॉर्न म्हणाला.
मी ज्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो त्यात स्टिव्ह वॉ हा सर्वात आवडता कर्णधार आहे. संघाची बिकट अवस्था असताना त्याने अनेकदा संघाला पराभवातून बाहेर काढताना त्याला अनेकदा पाहिले आहे. तो तासंतास खेळपट्टीवर टिकून राहु शकतो. त्याच्यासारखा संयम अन्य कोणत्याही फलंदाजाकडे मी पाहिला नाही. काही सामन्यांत तर पहिले 6 फलंदाज बाद झालेले असतानाही स्टिव्हने तळातील फलंदाजांना साथिला घेत सामने वाचविले आहेत. मी पाहिलेल्या फलंदाजांमध्ये स्टिव्हचे फलंदाजीचे तंत्र सर्वात भक्कम आहे, असेही वॉर्नने सांगितले.





