Champions Trophy 2025 : भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती

ICC Champions Trophy 2025 | चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.
सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे होते. मात्र, भारताविरुद्धच्या पराभवानंतर आता त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली तरीही स्मिथ ऑस्ट्रेलियासाठी कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळत राहणार आहे.
2028 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या ऑल्मिपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहण्याची स्मिथची इच्छा आहे. तसेच, पुढील काही महिन्यात पार पडणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही स्मिथने म्हटले आहे.
The great Steve Smith has called time on a superb ODI career 👏 pic.twitter.com/jsKDmVSG1h
— Cricket Australia (@CricketAus) March 5, 2025
निवृत्तीची घोषणा करताना स्मिथ म्हणाला की, हा प्रवास खूपच सुंदर होता. मी प्रत्येक मिनिटं याचा आनंद घेतला. खूप चांगल्या आठवणीसोबत राहिल्या आहेत. दोन वर्ल्ड कप जिंकणे ही सर्वोत्तम कामगिरी होती. या प्रवासात अनेक चांगले खेळाडूंची साथ मिळाली.’
‘आता 2027 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपची तयारी सुरू करण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे आता खेळ सोडण्याची ही योग्य वेळ आहे. कसोटी क्रिकेटला अजून प्राधान्य असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना, हिवाळ्यात वेस्ट इंडिज आणि त्यानंतर घरच्या मैदानावर इंग्लंडविरोधात खेळण्यास उत्साही आहे. मला या व्यासपीठावर अजूनही योगदान देण्यासाठी खूप काही करायचे आहे.’, असे स्मिथ म्हणाला.
दरम्यान, स्मिथने 2010 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ऑस्ट्रेलियाकडून 170 एकदिवसीय सामने खेळताना 43.3 च्या सरासरने 5800 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने 116 कसोटी आणि 67 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.





