“गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी लवकरच पावले उचलणार” – शंभूराज देसाई
कोयनानगर – शिवरायांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाल्यानंतर युनेस्कोतील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांच्याशी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी गडकिल्ल्यांवरील पर्यटनवाढीच्या संधींच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा केली. गडकिल्ल्यांच्या संरक्षण, सुविधा आणि माहिती केंद्र उभारणीसाठी पर्यटन विभागाकडून लवकरच पावले उचलली जातील, असे संकेतही देसाई यांनी दिले.
युनेस्कोमधील भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा यांनी देसाई यांची त्यांच्या ‘मेघदूत’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी शर्मा यांनी केलेल्या भरीव प्रयत्नांची दखल घेऊन मंत्री देसाई यांनी त्यांचा सत्कार केला.
युनेस्कोच्या मान्यतेनंतर महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर पर्यटनवाढीच्या संधींबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्राला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून पर्यटनवाढीस मोठा वाव आहे, असे देसाई यांनी सांगितले.





