संरक्षण मंत्रालयाचे पाऊल ; राष्ट्रीय छात्र सेनेच्या आढाव्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

नवी दिल्ली – राष्ट्रीय छात्र सेनेचा (एनसीसी) व्यापक आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने गुरूवारी 15 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली. त्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांना स्थान देण्यात आले आहे.
बदलत्या काळानुसार एनसीसी अधिक समर्पक करण्याच्या उद्देशातून स्थापण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष माजी खासदार बैजयंत पांडा असतील. इतर सदस्यांमध्ये खासदार राज्यवर्धनसिंह राठोड, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू वसुधा कामत, भारतीय शिक्षण मंडळाचे मुकूल कानिटकर, डेटाबुकचे सीईओ आनंद शहा आणि डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे आदींचा समावेश आहे.
राष्ट्र उभारणीमध्ये एनसीसीच्या छात्रांना अधिक प्रभावी योगदान देता यावे यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने समिती उपाय सुचवेल. एनसीसी ही युवकांचे चरित्र घडवणारी गणवेषधारी संस्था आहे. नेतृत्वक्षमता असणाऱ्या संघटित, प्रशिक्षित आणि प्रेरित युवकांची फळी उभी करणे हे एनसीसीचे उद्दिष्ट आहे.





