घर बांधकामाचा खर्च वाढला; सिमेंट आणि स्टीलच्या किंमतीत वाढ..

पावसाळा हळूहळू संपत आहे. त्यामुळे देशभरात बांधकामाला गती मिळणार आहे. जे लोक त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्याची तयारी करत होते ते आता घराचे बांधकाम सुरू करतील. मात्र, त्यांच्यासाठी निराशाजनक बातम्या समोर येत आहेत. सिमेंटच्या किमती वाढू लागल्या आहेत आणि आता स्टीलच्या किमतीतही प्रचंड वाढ दिसून येत आहे.
किंमती खूप वाढू शकतात –
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, भारतीय पोलाद कंपन्या लवकरच स्टीलच्या किमती वाढवू शकतात. कोकिंग कोळशाच्या महागाईमुळे स्टील कंपन्यांना जास्त खर्चाचा बोजा सहन करावा लागत आहे. अहवालानुसार, स्टील कंपन्या डिसेंबरपर्यंत किंमत वाढीची घोषणा करू शकतात. स्टीलच्या किमतीत ही वाढ 25 ते 50 डॉलर्स म्हणजेच 2000 ते 4000 रुपये प्रति मेट्रिक टन असू शकते.
कंपन्यांनी स्टीलच्या किमती वाढवण्यास केली सुरुवात –
अहवालानुसार, काही स्टील कंपन्यांनी किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. कंपन्यांनी हॉट-रोल्ड आणि कोल्ड-रोल्ड उत्पादनांच्या किमती सुमारे 12-24 डॉलर्स प्रति टन म्हणजेच 2000 रुपये प्रति टन वाढवल्या आहेत. आता जर स्टीलच्या किमती वाढल्या तर त्याच प्रमाणात बारच्या म्हणजेच स्टीलच्या रॉडच्या किमतीही वाढणे स्वाभाविक आहे. त्यामुळे घर बांधण्याच्या खर्चावर थेट परिणाम होणार आहे.
स्टील बारचे भाव वाढू लागले –
घराची मजबुती प्रामुख्याने सिमेंट आणि स्टीलवर अवलंबून असते. घर बांधण्याच्या एकूण खर्चात या दोघांचा सर्वाधिक वाटा आहे. आता स्टील बार महाग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांत देशातील विविध शहरांमध्ये स्टील बार च्या किमतीत सरासरी 10-12 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
सिमेंटचेही भाव वाढले –
तर सिमेंट आधीच वाढ दाखवत आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने अलीकडेच म्हटले होते की सप्टेंबर महिन्यात, एक महिन्यापूर्वी म्हणजेच ऑगस्टच्या तुलनेत सिमेंटच्या सरासरी किमती 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जेफरीज इंडियाच्या मते, सिमेंटच्या किमती पूर्व भारतात सर्वाधिक वाढल्या आहेत. ऑगस्टअखेर सिमेंटचे जे भाव होते, ते सप्टेंबरअखेर 50 ते 55 रुपये प्रति पोतीपर्यंत वाढले. तर देशाच्या इतर भागात सिमेंटच्या किमती तुलनेने कमी वाढल्या आहेत. या काळात इतर भागांमध्ये प्रति बॅगच्या किमतीत 20 रुपयांनी वाढ झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.





