काही देशांकडून दर्जाहीन पोलाद भारतात खपवण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली – काही देश भारतामध्ये दर्जाहीन पोलाद निर्यात करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा भारतातील उद्योगावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेतली असून या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी लवकरच उपाययोजना जारी केल्या जातील असे केंद्रीय पोलाद मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक वाहनासंबंधातील परिषदेत बोलताना कुमारस्वामी यांनी सांगितले की, उद्योजकांच्या संघटनांनी आणि पोलाद उद्योगाने यासंदर्भात सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. स्वस्त आणि दर्जाहीन पोलाद भारतात खपवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारत जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश आहे. मात्र तरीही काही देश भारतामध्ये पोलाद खपविण्याचा प्रयत्न करत आहेत.
सरलेल्या आर्थिक वर्षात भारताने 8.32 दशलक्ष टन पोलादाची आयात केली. त्या अगोदरच्या वर्षात ही आयात केवळ 6.02 दशलक्ष टन होती. यातील बरीच आयात अनावश्यक असल्याचे सांगितले जाते. चीनकडून या कालावधीत बरेच पोलाद आयात झाले आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत चीनकडून जवळजवळ दोन दशलक्ष टन पोलादाची आयात झाली आहे. चीनमध्ये मंदी असल्यामुळे चीनमधील पोलाद कंपन्या दर कमी करून इतर देशात पोलाद निर्यात करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला जातो.





