तामीळनाडू सरकारचे विविध राज्यांना आवाहन चेन्नई –बऱ्याच राज्यांनी दिवाळीत फटाके उडविण्यावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर करोना व्हायरसचा परिणाम कायम राहणार आहे. या कारणामुळे यावर्षी फटाका उद्योग अडचणीत आला आहे. राजस्थान, ओरिसा, दिल्ली या राज्यांनी दिवाळीत फटाक्यावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर कर्नाटक सरकार असा निर्णय लवकरच घेणार आहे. तमिळनाडूमध्ये फटाका उद्योग मोठ्या प्रमाणात एकवटलेला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानिस्वामी यांनी राजस्थान व ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून फटाक्यांवरील बंदीबाबत फेरविचार करण्याची विनंती केली आहे. या उद्योगात आठ लाख लोक काम करतात. जर अनेक राज्यांनी बंदी लागू केली तर तयार केलेले उत्पादन वाया जाणार आहे, असे तामिळनाडूने म्हटले आहे. करोना व्हायरसमुळे अगोदरच फटाका उद्योग आपल्या क्षमतेच्या 60 टक्के काम करीत आहे. दिवाळीमध्ये जर विक्री झाली नाही तर या उद्योगावर लघु आणि पल्ल्यात भयंकर परिणाम होणार असल्याचे फटाका उद्योगातील उद्योजकांनी सांगितले. ज्या राज्यात बंदी घालण्यात आलेली आहे त्या राज्यात फटाका उद्योगातील काहींनी बराच माल पाठवलेला आहे. त्यांचे पेमेंट मिळेल की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. सध्या फटाका उद्योगातील 30 टक्के कामगार बेकार झाले आहे. बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर बऱ्याच कामगारांना रोजगार गमवावा लागणार आहे.