Maharashtra State Marathi Film Awards2025 : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत मानाचा महाराष्ट्र राज्य सरकारचा चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा वरळी येथील डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये ५ ऑगस्ट २०२५ रोजी अत्यंत दिमाखात पार पडला. या भव्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी सिनेसृष्टीतील मान्यवर आणि कलाकारांनीही मोठ्या संख्येने या सोहळ्याला हजेरी लावली. या वर्षी दोन वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे जाहीर या वर्षी एक खास बाब म्हणजे राज्य सरकारतर्फे ६० वा आणि ६१ वा राज्य चित्रपट पुरस्कार एकत्रितपणे प्रदान करण्यात आला. या निमित्ताने चित्रपट, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध दिग्गजांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळेंना संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ ने गझल सम्राट भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि ३० लाखांचा धनादेश देण्यात आला. महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार २०२४ सालासाठीचा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि १० लाखांचा धनादेश असे होते. मुक्ता बर्वे, अनुपम खेर आणि काजोल यांचाही गौरव चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.२०२४ चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना प्रदान करण्यात आला.तर स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना मिळाला. विशाल शर्मा यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज वारसा पुरस्कार’ या पुरस्कार सोहळ्यात आणखी एक महत्त्वाचा क्षण म्हणजे युनेस्कोच्या यादीत वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवून देणाऱ्या विशाल शर्मा यांना छत्रपती शिवाजी महाराज वारसा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या भव्य सोहळ्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाची मोठ्या प्रमाणावर दखल घेण्यात आली असून नवोदित आणि दिग्गज कलावंतांना प्रेरणा देणारा ठरला आहे.