Anupam Kher : “सर्वांसमोर अपमान करण्याची काय गरज होती?” दलेर मेहंदींसाठी अनुपम खेर सरसावले; मंत्र्यांना चांगलचं सुनावलं!
Anupam Kher : गायक मिका सिंग, कपिल शर्मा आणि बादशाह यांच्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही दलेर मेहंदी यांना पाठिंबा दर्शवला असून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली.

Anupam Kher : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी सध्या एका सांस्कृतिक कार्यक्रमामुळे चर्चेत आले आहेत. उत्तराखंडमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना गाणं सादर करता आले नसल्याचा आणि त्यांनी लिप-सिंक केल्याचा आरोप उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांनी केला आहे.
या घटनेनंतर मनोरंजनविश्वातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गायक मिका सिंग, कपिल शर्मा आणि बादशाह यांच्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही दलेर मेहंदी यांना पाठिंबा दर्शवला असून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली.
“दलेर मेहंदी यांना मी २५-३० वर्षांपासून ओळखतो”
अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले की, त्यांनी दलेर मेहंदी यांच्याशी संबंधित व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये एक मंत्री मंचावर येऊन गायकाशी उद्धटपणे बोलताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
“मी त्या वेळी तिथे उपस्थित नव्हतो, त्यामुळे नेमकं काय घडलं, हे मला माहीत नाही. मात्र, मी दलेर मेहंदी यांना गेल्या २५ ते ३० वर्षांपासून ओळखतो. माझ्या माहितीनुसार, ते दारू पीत नाहीत. मी आजपर्यंत भेटलेल्या सर्वोत्तम व्यक्तींपैकी ते एक आहेत,” असे अनुपम खेर यांनी म्हटले.
View this post on Instagram
दलेर मेहंदी यांची प्रकृती ठीक नसल्याचा उल्लेख
अनुपम खेर यांनी दलेर मेहंदी यांच्या प्रकृतीबाबतही भाष्य केले. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती आपल्याला असल्याचे त्यांनी सांगितले. दलेर मेहंदी यांनी आयोजकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे वचन दिले असावे आणि त्या वचनाचा मान राखण्यासाठी ते कार्यक्रमाला आले असावेत, अशी शक्यता अनुपम खेर यांनी व्यक्त केली.
“सार्वजनिक मंचावर अपमान करण्याची काय गरज होती?”
या संपूर्ण घटनेवर नाराजी व्यक्त करताना अनुपम खेर यांनी सार्वजनिक व्यासपीठावर एखाद्या व्यक्तीशी अशा प्रकारे बोलणे चुकीचे असल्याचे म्हटले. एखाद्या कलाकाराच्या सादरीकरणाबाबत आक्षेप असेल, तर त्याच्याशी सर्वांसमोर वाद घालण्याऐवजी बाजूला घेऊन आदराने चर्चा करता आली असती, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
“मंत्री महोदय, तुम्हाला त्यांच्या सादरीकरणाबद्दल तक्रार असेल, अगदी रागही आला असेल. पण सर्वांसमोर मंचावर त्यांचा असा अपमान करण्याची काय गरज होती?” असा थेट सवाल अनुपम खेर यांनी उपस्थित केला.
“चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला हवा”
अनुपम खेर यांनी या प्रकरणावर मनोरंजनविश्वातील कलाकारांनीही उघडपणे बोलण्याची गरज व्यक्त केली. एखाद्या सहकलाकाराशी चुकीची वागणूक होत असेल, तर त्याच्या समर्थनार्थ इतरांनीही पुढे यायला हवे, असे ते म्हणाले.
“हा कोणाचा बचाव करण्याचा विषय नाही, तर चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्याचा आहे. अशा परिस्थितीत आपण गप्प राहता कामा नये. ही केवळ मिका सिंग यांची जबाबदारी नाही. आपण ओळखत असलेल्या लोकांसाठी सर्वांनी आवाज उठवला पाहिजे.” असे आवाहन त्यांनी केले.
BHAGWANT MANN: भगवंत मान यांना दिल्ली विमानतळावर 3 तास थांबवले ; 50 हजार रुपयांचा ठोठावला दंड





