Pune : राज्यस्तरीय जाधवर विज्ञान महोत्सव

पुणे : प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने सहाव्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी जाधवर संकुलात हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवामधील स्पर्धा शालेय (इयत्ता ८ वी ते १० वी), कनिष्ठ (इयत्ता ११ वी व १२ वी), वरिष्ठ महाविद्यालय (पदविका शिक्षण) आणि पदव्युत्तर व खुल्या अशा चार गटांत होणार आहे. विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत.
विजेत्यांना एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख २४ डिसेंबर आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अॅड. जाधवर यांनी केले.
संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० लाख
भारताबाहेरील इतर देशांमध्ये संशोधन करून पेटंट मिळविण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतामध्ये संशोधन व पेटंटचे प्रमाण कमी असून, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याला विनातारण १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देणार असल्याचे अॅड. शार्दुल जाधवर यांनी सांगितले.




