सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी आपले म्हणणे मांडा; खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस

छत्रपती संभाजीनगर : परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सोमनाथ यांच्या आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाने ही याचिका स्वीकारली असून पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे. या प्रकरणी राज्य शासनाला नोटीस बजावण्यात आली आहे. सूर्यवंशी कुटुंबीयांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हे स्वतः हायकोर्टात आले आणि त्यांनी बाजू मांडली.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करावी, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे आतापर्यंत निलंबन झालेले नसून त्यासंदर्भात कारवाई करावी, अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मंगळवारी याचिकाकर्त्यांकडून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
राज्य सरकारसह संबंधित यंत्रणांना नोटीस
हायकोर्टकडून राज्य सरकारसह संबंधित यंत्रणांना नोटीस जारी करण्यात आली आहे. २९ एप्रिल पूर्वी आपले म्हणणे सादर करायला सांगितले आहे. या प्रकरणी २९ एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. मारहाण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई झाली नाही. निलंबनही केलेले नाही. न्यायालयीन चौकशीनंतर कुठलीही कारवाईची प्रक्रिया, कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वे निर्धारित केलेली नाहीत. त्यामुळे या विरोधात ही याचिका सूर्यवंशी यांच्या आईने दाखल केली आहे.
बदलापूर आणि परभणी प्रकरण एक सारखे
प्रकाश आंबेडकर म्हणाले, बदलापूर प्रकरण आणि परभणी प्रकरण एक सारखे आहे. बदलापूर प्रकरणी तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे, याही प्रकरणात तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात केली. मध्यंतरी CID ने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत चौकशी केली होती, त्याविषयी बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, पुढच्या सुनावणीच्या वेळी CID ला आरोपी करू.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण नेमकं काय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर परभणीत हिंसाचार उसळला होता. यानंतर पोलिसांनी काही तरुणांना अटक केली होती. यापैकी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला होता.
मात्र, राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सोमनाथच्या मृत्यूप्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी सोमनाथ यांच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल (दि. ०८ एप्रिल) पहिली सुनावणी पार पडली. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या बाजूने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: युक्तिवाद केला.


