राज्य सीईटी सेलकडून विधी; अभ्यासक्रमासाठी अर्जास मुदतवाढ

पुणे – तीन वर्षीय विधी अभ्यासक्रम, बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड आणि बीएड-एमएड या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सीईटी सेलने घेतला आहे. त्यानुसार तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना २१ जुलैपर्यंत, तर उर्वरित अभ्यासक्रमांना २५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. याचे सविस्तर वेळापत्रक राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी व अर्ज करण्याची मुदत संपली होती. मात्र, अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी हिताचा विचार करून तीन वर्षीय विधी अभ्यासक्रम आणि शिक्षणशास्त्र संबंधित अन्य अभ्यासक्रमांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत काही कारणांमुळे अर्ज करू शकले नाहीत, त्यांना अजूनही अर्ज संधी उपलब्ध झाली आहे.




