Law Admission : कायदा शिक्षणात मुलींचा दबदबा! पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमात सलग तिसऱ्या वर्षी मुलींची बाजी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्य सीईटी सेलतर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी राबविण्यात आलेल्या पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत राज्यातील १६१ विधी महाविद्यालयांमध्ये एकूण १३ हजार ५९७ जागांपैकी १० हजार २६७ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. ही टक्केवारी ७५.५० इतकी असून, विधी अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी मुलींनी आघाडी कायम ठेवली आहे. यावर्षी प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये ५३.१० टक्के मुलींचा समावेश आहे.
यंदा पाच वर्षीय विधी शाखेची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून सुरू झाली. ही प्रक्रिया सुमारे तीन महिने सुरू होती. यामध्ये तीन मुख्य व एक संस्थात्मक अशा एकूण चार फेऱ्यांमध्ये हे प्रवेश पूर्ण करण्यात आले. मागील तीन वर्षांची आकडेवारी पाहिल्यास पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ११ हजार ३५६ जागांपैकी ९ हजार २७८ जागांवर प्रवेश झाले असून, कॅपअंतर्गत प्रवेशाची टक्केवारी ८१.७० इतकी आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (इब्ल्यूएस) राखीव असलेल्या जागांना मात्र अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे. या प्रवर्गासाठी ९६७ जागांपैकी केवळ ३२० जागांवर प्रवेश होऊन ६४७ जागा रिक्त राहिल्या. व्यवस्थापन कोट्यातील जागाही पूर्ण क्षमतेने भरलेल्या नाहीत. त्यातील १२७४ जागांपैकी ६६९ जागांवर प्रवेश होऊन ६०५ जागा रिक्त राहिल्या आहेत.
“बारावीनंतर विधी क्षेत्रात करिअर करण्याकडे विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. यामध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त असणे, हा एक सकारात्मक बदल आहे. यावर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ७५ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यावर्षी चार फेऱ्या झाल्या व प्रक्रिया सुरळीत पार पडली.”
– दिलीप सरदेसाई, आयुक्त, राज्य सीईटी कक्ष





