राज्याच्या इतिहासात पहिल्यादांच चौंडीत होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मोठा निर्णय होणार?

मुंबई : राज्यातील महायुती सरकार अहिल्यादेवींचे जन्म गाव असलेल्या श्री क्षेत्र चौंडी (ता. जामखेड) येथे ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठक घेणार आहे. ३१ मे रोजी अहिल्यादेवींच्या जयंतीदिनीच ही बैठक घेण्यात येणार होती. मात्र, उन्हाची संभाव्य तीव्रता विचारात घेऊन राज्य सरकारने तारखेत बदल केला आणि बैठक अलीकडे घेतल्याचे समजते. या विशेष मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चौंडी आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.
चौंडी येथील नियोजित ५५० कोटी रुपये खर्चाच्या अहिल्यादेवी सृष्टीसह अन्य विकासकामांना निधी देण्याचा निर्णय बैठकीत होऊ शकतो. तसेच ही शिल्पसृष्टी चौंडी की चास येथे उभारावी, यावरही बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यादांच ग्रामीण भागात अशी बैठक होत आहे. बैठकीला तीनच दिवस राहिल्यानं जिल्हा प्रशासनाची नियोजनासाठी धावपळ उडाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक विकासकामे मार्गी लागणार?
मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक वास्तूंचे संर्वधन यासह अनेक विकासकामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या नियोजनासंदर्भात प्रशासकीय स्तरावरून कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. अहिल्यादेवींचे असामान्य कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचेल, अशा दृष्टीने चौंडी विकास आराखडा असावा, असा आग्रह विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी यापूर्वी घेतलेल्या बैठकीत दिले आहेत. त्यानुसार सरकारने पावले उचलली आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी होत असताना, त्यांच्याच जन्मगावी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने, यात मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याने ही बैठक यशस्वी होण्यासाठी राज्य सरकारने देखील पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारने बैठकीच्या तयारीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे.





