भारतातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेच्या नफ्यात 10% घट

नवी दिल्ली – भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने शनिवारी आपला चौथ्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदात बँकेचा नफा 10 टक्क्यांनी कमी होऊन 18,643 कोटी रुपये इतका झाला असल्याचे दाखविण्यात आले आहे.
गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत या बँकेला 20,698 कोटी रुपयाचा नफा झाला होता. बँकेने शेअर बाजाराला कळविलेल्या माहितीत म्हटले आहे की, या तिमाहीत बँकेचे व्याजातील उत्पन्न वाढून 1,19,666 कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत ही रक्कम 1,11,043 कोटी रुपये इतकी होती.
बँकेला या कालावधीत अनुत्पादक मालमत्ता कमी करण्यात यश मिळाले आहे. चौथ्या तिमाहीतील ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 1.82% इतकी आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत हे प्रमाण 2.24% इतके होते. या तिमाहीत बँकेची निव्वळ अनुत्पादक मालमत्ता केवळ 0.47% इतकी नोंदली गेली आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 0.57% इतके होते.
सरलेल्या पूर्ण वर्षात बँकेचा नफा 16 टक्क्यांनी वाढून 70,901 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी नफ्याची रक्कम 61,077 कोटी रुपये होती. आर्थिक वर्ष 2025 साठी बँकेच्या संचालक मंडळाने प्रति शेअर 15.90 रुपये लाभांश जाहीर केला आहे. आगामी काळात बँकेने विविध स्त्रोताच्या माध्यमातून 25 हजार कोटी रुपयाचे भांडवल उभारण्याचे ठरविले आहे.





