पुणे जिल्हा | भिगवण ट्रामा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करा

पळसदेव, (वार्ताहर) – भिगवण परिसरातील नागरिकांना महिला पुरुष व लहान मुलांच्या आरोग्यासाठी शासनाने ट्रामा केअर सेंटर चालू करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून मोठी इमारत बांधलेली आहे. सर्व प्रकारची साधनसामग्री उपलब्ध करून ट्रामा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालू होणे बाकी असताना राज्यकर्त्यांनी उद्घाटन करून ट्रामा केअर सेंटर चालू केलेले आहे.परंतु प्रत्यक्षात हे ट्रामा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालू झालेले नाही.
येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. तसेच सदर ट्रामा केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात उपकरणाची कमतरता आहे. तसेच ट्रामा केअर सेंटर मध्ये कर्मचार्यांची कमतरता आहे. अनेक सुविधांची या ठिकाणी वानवा असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, असा दावा मराठा महासंघाचे पांडुरंग जगताप यांनी केला आहे.
याबाबत भिगवण परिसरातील अनेक सामाजिक संघटनांनी शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. शासनाने करोडो रुपये खर्च करून ट्रामा सेंटर चालू करून परिसरातील लोकांना याचा काहीही फायदा होत नसल्याने याबाबत अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही.
म्हणजेच शासनाने करोडो रुपये खर्च कशासाठी केलेले आहे. असा प्रश्न परीसरातील तरूणांना पडत आहे. त्यामुळे परिसरातील सर्व सामाजिक संघटनांचे वतीने दहा दिवसांमध्ये सर्व सुविधांसह ट्रामा केअर सेंटर चालू न केल्यास मोठे जनआंदोलन उभारणार आहे. याची कल्पना शासनास यावी यासाठी पूर्वसूचना म्हणून सदरचे निवेदन देण्यात येत असल्याचं या वेळी सांगण्यात आले.





