Otur Rural Hospital – १४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आणि गेल्या दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची घोषणा जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केली. रुग्णालयाच्या पटांगणात गुरूवारी (दि. ९) आयोजित सर्वपक्षीय बैठकीत आमदार सोनवणे बोलत होते. रुग्णालयाची इमारत तयार असूनही ती धूळखात पडल्याने ज्येष्ठ नागरिक संघाने उपोषणाचा इशारा दिला होता, तसेच दै. प्रभातने या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली होऊन लोकार्पण निश्चित करण्यात आले. यावेळी आमदार सोनवणे म्हणाले की, सध्या हे रुग्णालय ३० खाटांचे असले तरी भविष्यात त्याचे १०० खाटांपर्यंत विस्तारीकरण करण्यात येईल. माळशेज घाट परिसरात होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याचीही योजना आहे. यामुळे जखमींना पुणे किंवा मुंबईला नेण्याऐवजी ओतूरमध्येच तातडीने उपचार मिळतील आणि जीवितहानी टाळता येईल. रुग्णालयात सर्पदंश व वन्यप्राणी चावल्यावरील लस, अत्यावश्यक औषधसाठा आणि अखंड वीजपुरवठ्यासाठी जनरेटरची सोय उपलब्ध असेल. या बैठकीस आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. गोलायत, उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. पल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे आणि डॉ. श्रीहरी सारोक्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रा. ज्ञा. डुंबरे, महादेव ओतुरकर, छाया तांबे, प्रशांत डुंबरे, मोहित ढमाले, विनायक तांबे, अनिल तांबे यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.