Vijay Wadettiwar : मुंडेंच्या राजीनाम्यासह बीडची स्वच्छता मोहिम सुरु करा; काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना सल्ला

मुंबई : बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आणि तशा कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशारा बीडचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. अशा लोकांवर मकोका लावायला देखील मी मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले होते. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
ज्यांनी असे कृत्य केले, पहिले त्यांच्यावर मकोका लावा. बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचे असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन सुरुवात करावी लागेल, असे आवाहन विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांना दिले. बीड जिल्ह्यात ज्यांनी चुकीची कामे केली, त्यांच्यावर आधी मकोका लावा. कालच त्यांच्या सत्तेतील आमदारांनी जिल्हा नियोजन समितीमधून काम न करता 70 कोटी रुपयांची बोगस बिले काढल्याचा आरोप केला.
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचाराची किती मोठी यादी आहे, हे समोर आले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचे असेल तर, नुसते बोलून होणार नाही, त्यासाठी कृती करावी लागेल. त्याची सुरुवात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन करावी लागेल, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना दिला. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, तरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बोलण्याला अर्थ राहील, बीड जिल्ह्यातील जनतेशी ते प्रामाणिक आहे हे दाखवता येईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.





