युक्रेनला पाठिंबा देण्याचे स्टार्मर यांचे आवाहन

लंडन : रशियाविरुद्धच्या संघर्षात युक्रेनच्या पाठीमागे ठामपणे भे राहण्याचे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी जागतिक नेत्यांना केले आहे. स्टार्मर यांनी आज जगभरातील प्रमुख देशांच्या नेत्यांशी आभासी पद्धतीने संवाद साधला आणि रशियाच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यवहारानुसार रशियाला खेळ खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे स्टार्मर यांनी जागतिक नेत्यांना उद्देशून सांगितले.
ब्रिटनने बोलावलेल्या या आभासी परिषदेमध्ये २५ देशांचे नेते सहभागी झाले होते. स्टार्मर यांनी या परिषदेला रशियाविरुद्धच्या इच्छुकांची आघाडी असे नाव दिले होते. या परिषदेमध्ये युक्रेन व्यतिरिक्त युरोपीय संघ आणि नाटोचे सदस्य देश तसेच कॅनडा, ऑस्ट्रेनिया आणि न्यूझीलंड देखील सहभागी झाले होते. ट्रम्प यांनी युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापनेसाठी जो पुढाकार घेतला आहे, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. नाटोच्या सदस्यांकडून युक्रेनमध्ये शांतिसैन्य तैनात केले जाण्याची वेळ आल्यास या शांतीसैन्याची जबाबदारी आणि स्वरुप काय असावे हे निश्चित करण्यासाठीची चर्चा देखील यावेळी अपेक्षित होती.
जर पुतीन यांना खरोखरच शांतता हवी असेल, तर सोपे गणित आहे. त्यांनी युक्रेनवरील हल्ले थांबवावेत आणि युद्धबंदीच्या कराराला मान्यता द्यावी. ते ही स्थायी आणि चिरकालिन युद्धबंदी कशी घडवून आणतात हे जग बघायला तयार आहे, मात्र जर पुतीन याला तयार नसतील तर रशियावर कटोर आर्थिक निर्बंध घालून हे युद्ध लवकरात लवकर कसे समाप्त होईल, हे बघितले पाहिजे. कारण ट्रम्प यांच्या म्हणण्य.नुसार ३० दिवसांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे पुतीन सरसकट दुर्लक्ष करत असून युद्धबंदीच्या करारासाठी विनाकारण विलंब लावत असल्याचा आरोप देखील स्टार्मर यांनी केला.
स्टार्मर यांचा ३ कलमी कार्यक्रम
स्टार्मर यांनी जागतिक नेत्यांसमोर ३ कलमी कार्यक्रम ठेवला आहे. यामध्ये रशियापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी युक्रेनला लष्करी दृष्ट्या सक्षम करणे, कोणत्याही वाटाघाटींसाठी सामूदायिक गट म्हणून चर्चेला तयार रहाणे आणि रशियावर नेहमीच दबाव कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. ब्रिटनचे संरक्षण मंत्री जॉन हीले अलिकडेच पॅरिसमध्ये जर्मनी, फ्रान्स, पोलंड आणि इटलीच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन आले आहेत. तसेच कॅनडामध्ये जाऊन जी-७ गटाच्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांचीही त्यांनी भेट घेतली. या सर्वांशी चर्चेनंतर स्टार्मर यांनी जागतिक नेत्यांशी संवाद साधला.




