स्टॅम्प ड्युटी आता एकसारखी होणार

पुणे – इक्विटेबल (गहाणखत) आणि सिंपल मॉर्गेज या दोन्हींवर आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी आता एकसारखी करण्याचा निर्णय नोंदणी व मुदांक शुल्क विभागाने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर दोन्ही गहाणखतांसाठी 0.3 टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.
गहाणखताचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी इक्विटेबल आणि सिंपल मॉर्गेज यांचा सर्वाधिक वापर होतो. परंतु, त्यासाठी वेगवेगळी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. इक्विटेबल मॉर्गेजसाठी सध्या 0.2 टक्के, तर सिंपल मॉर्गेजसाठी 0.5 टक्के स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते.
अनेकदा त्यामुळे नागरिकांचा गोंधळ होतो. त्यातून वारंवार लोकांना सबरजिस्टर कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. दरवर्षी अशाप्रकारचे सुमारे पाच ते सहा लाख गहाणखताचे व्यवहार होतात. या दोन्ही मॉर्गेजमधील गोंधळ दूर करून त्यामध्ये सुटसुटीतपणा आणणे व त्यांचे शुल्क एकसमान करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला.
त्यासाठी स्टॅम्प ऍक्टमध्ये दुरुस्ती करून या दोन्ही मॉर्गेजवर 0.3 टक्के मुद्रांक शुल्कच आकारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.





