Pimpri : सीमा भिंतीचे रखडलेले काम धोकादायक

चिंचवडगाव : पिंपरी चिंचवड महापालिकेने चिंचवडगाव येथील केशवनगर, तानाजी नगर, माणिक कॉलनी ते संत मदर तेरेसा उड्डाणपूलापर्यंत नदीकिनारी १८ मीटर रुंद रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात पवना नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आणि त्यानंतर नागरी वस्तीत येऊ नये म्हणून महापालिकेने संरक्षणात्मक सीमा भिंत उभारली आहे. मात्र, चिंचवडमधील पोदार शाळेजवळील २०० ते ३०० फूट अंतरातील सीमा भिंतीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. त्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
आमदारांच्या सूचनेकडेही दुर्लक्ष
या रखडलेल्या कामाच्या ठिकाणाहून गेल्या वर्षी जुलै महिन्यात आलेल्या पवना नदीच्या पुराचे पाणी थेट नागरी वस्तीत शिरले होते. यामुळे अनेक घरांना पाण्याचा फटका बसला होता. मोठ्या प्रमाणात वित्तहाणी झाली होती. तरीही यावर्षी पावसाळा सुरु होऊनही महापालिकेने या अपूर्ण सीमा भिंतीच्या कामाची कोणतीही दखल घेतलेली नाही. नागरिकांनी वारंवार महापालिका अधिकाऱ्यांना निवेदनं दिली असून, आमदार शंकर जगताप यांनाही जनता दरबारात निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊनही अद्याप कोणतेही काम सुरू करण्यात आलेले नाही.
पुन्हा पुराचा धोका
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी सीमा भिंतीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता पावसाळा सुरू होऊनही या भागातील काम जैसे थे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवना नदीच्या पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरत असल्याचे यावरून दिसून येते.
नदीपात्रातील राडारोड्याकडेही दुर्लक्ष
दरम्यान, या परिसरात नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे पवना नदीचे पात्र अरुंद होत असून, नैसर्गिक प्रवाह अडवल्या जात आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याने ‘धुतराष्ट्रा’ची भूमिका घेतल्याचे आरोप स्थानिकांनी केले आहेत.
महापालिकेचे निष्क्रीय धोरण
यासंदर्भात नागरिक संतप्त असून, “महापालिकेच्या निष्क्रीय धोरणामुळे नागरिकांचे जिवित आणि मालमत्ता धोका पत्करावी लागत आहे. सीमा भिंतीचे काम पूर्ण न झाल्यास यंदाही मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांची मागणी
महापालिकेने तातडीने लक्ष देऊन सीमा भिंतीचे काम पूर्ण करावे, नदीपात्रातील अतिक्रमण व राडारोडा हटवावा, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
विसर्गामुळे धोका वाढला
यंदाच्यावर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरूवात झाली असून सध्या पवना धरण जवळपास ८० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. जर पाऊस सुरू राहिला आणि धरणातून १५ हजार क्युसेक्स पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग केला तर चिंचवडमधील नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते. मात्र गेल्यावर्षी पवना धरण ७० टक्के भरलेले असताना पवना धरण परिसरात २४ तासांत ३७५ मि.मि. पाऊस झाला. त्यावेळी धरणातून पाणी न सोडताही पवना नदीला पूर येऊन पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरले होते.
सीमा भिंतीचे काम रखडले आहे; पोदार शाळेजवळ अर्धवट भिंत
गेल्यावर्षी पुराचे पाणी वस्तीत शिरले; यंदाही धोका कायम
महापालिकेकडे वारंवार विनंती; आमदारांच्या सूचनेकडेही दुर्लक्ष
नदीपात्रातील राडारोड्याबाबत पर्यावरण विभागाची निष्क्रिय भूमिका
महापालिकेच्या चालढकलपणामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त





