Nagar | प्रशिक्षणाला दांडी ; गैरहजर कर्मचार्यांना नोटीसा

नगर, (प्रतिनिधी) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व लक्षात घेवून विहित पद्धतीने कामे करावीत आणि निवडणूक प्रक्रिया बिनचूक पार पाडावी, अशा सूचना अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिल्या.
तसेच प्रशिक्षणाला दांडी मारणार्या कर्मचार्यांना नोटीसा बजविण्यात आला असून, त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. समाधान कारक खुलासा न आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर शहर विधानसभा मतदार संघाच्यावतीने नंदनवन हॉल, अहिल्यानगर येथे मतदान संबंधीच्या कामकाजाबाबतचे तसेच भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल,अहिल्यानगर येथे मतदान यंत्र हाताळणी बाबतचे प्रशिक्षण पार पडले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अहिल्यानगर तहसीलदार संजय शिंदे, अप्पर तहसीलदार स्वप्निल ढवळे, नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर, सुधीर उबाळे, अनिल तोरडमल, कैलास साळुंके आदी उपस्थित होते.
मतदानाची कार्यपद्धती यावेळी सांगण्यात आली. या प्रसंगी सुधीर पाटील म्हणाले, सर्वसमावेशक आणि सर्वांना सोयीची होईल, अशी निवडणूक घेण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. मतदान हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया, माहिती पुस्तिका याचे अवलोकन करून कामकाज पहावे. मतदान प्रक्रिया राबविताना काही अडचणी असल्यास वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.
यावेळी हे प्रशिक्षण दोन सत्रात झाले. सकाळ व दुपार अशा दोन सत्रामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 2 हजार 40 अधिकारी – कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी करावयाची कार्यवाही, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था,
निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली. मतदानाच्यावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही माहिती देण्यात आली. प्रशिक्षण सत्रा दरम्यान जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक कामकाजाबाबतची चित्रफीत दाखवण्यात आली तसेच उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे कामे शपथ देण्यात आली. पहिल्यासत्रात ३९ कर्मचारी यांनी दांडी मारली. त्यांना प्रशासनाच्यावतीने नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून खुलासा माहितला आहे.





