Pimpri : संत तुकाराम कारखान्याची निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू

वडगाव मावळ : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सोमवार (दि.३) पासून सुरू होणार असून, दि ५ एप्रिलला मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.
मावळ, मुळशी, हवेली, खेड व शिरूर अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री संत तुकाराम साखर कारखान्यात एकूण २२ हजार २५८ मतदारसंख्या असून, २१ संचालक कार्यरत आहेत. संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३ ते ७ मार्चपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत समिती सभागृह, पहिला मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे येथे नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती होणार आहे.
प्राप्त नामनिर्देशन पत्राच्या छाननीची प्रक्रिया त्याच ठिकाणी १० मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कामकाज संपेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच, नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी २५ मार्चपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर २६ मार्च रोजी अंतिम विधीग्राह्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे व पात्र उमेदवारांना निशाणी (निवडणूक चिन्ह) वाटपाची कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे.
दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदानप्रक्रिया घेण्यात येणार असून मतमोजणी दिनांक ६ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी दिली.
मतदारसंघ व प्रतिनिधी संख्या
१) व्यक्ती उत्पादक सभासद गट नंबर १ हिंजवडी ताथवडे (संचालक संख्या ३), गट नंबर २ पौड-पिरंगुट (संचालक संख्या ३), गट नंबर ३ तळेगाव-वडगाव (संचालक संख्या ३) गट नंबर ४ सोमाटणे-पवनानगर (संचालक संख्या ३), गट नंबर ५ खेड-हवेली शिरूर (संचालक संख्या ४).
२) अनुसूचित जाती/जमाती (संचालक संख्या १)
३) महिला राखीव प्रतिनिधी (संचालक संख्या २)
४) इतर मागासवगीय प्रतिनिधी (संचालक संख्या १)
५) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी (संचालक संख्या १)





