ध्यानसाधनेतून येते शरीर-मनाची स्थिरता : प. पू. प्रवीण ऋषीजी महाराज

ज्ञानसाधनेतूनच आपल्याला शरीराचे आणि मनाची स्थिरता प्राप्त करता येते. आयुष्यात हे संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन प. पू. प्रवीण ऋषीजी म. सा. यांनी केले. परिवर्तन चातुर्मास 2025 मध्ये आयोजित प्रवचन मालेत आनंदगाथा सप्ताहात ते बोलत होते. प. पू. प्रवीण ऋषीजी म. सा. म्हणाले, आपल्या शरीरासाठी ध्यान आवश्यक आहे. सामायिक क्रिया करणे आणि सामायिक साधना करणे यात फरक आहे. योगामुळे जसं शरीरावर नियंत्रण मिळवता येतं तसेच ध्यानामुळे शरीर आणि मनावरही नियंत्रण साधता येते. ध्यान साधनेने परिपक्व देह साधता येतो. हेच साधणं आपल्याला जमलं पाहिजे.
ध्यानाचे महत्त्व सांगताना जैन धर्मगुरू प. पू. प्रवीण ऋषीजी म. सा. म्हणाले ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील एखादे आसन करताना आपण त्यामध्ये स्वस्थ बसू शकतो का? आपण एकाच जागी एकाच स्थितीत देवासारखे शांत आणि स्वस्थ बसून राहू शकतो का? तर नाही कारण एक तर आपलं चित्त विचलित होत असतं आणि त्याचबरोबर हळूहळू शरीरात कुठे ना कुठे वेदनेची जाणीव होऊ लागलेली असते. ही वेदनेची जाणीव म्हणजेच आर्तध्यान सुरू झालेल असतं. आर्तध्यान म्हणजे शारीरिक वेदनेची जाणीव होत राहणार. या देहाने दुःखाल धारण करून ठेवले आहे. त्यामुळे या देहाला दुःखातून मुक्त करणे गरजेचे असतं. जेव्हा ते मुक्त होईल तेव्हा तीच परमात्म्याची सामायिक किंवा ध्यान साधना होईल.
समजा दिवसातील काही मिनिटे एखादा चुकीचा विचार आपल्या मनाला जर स्पर्शून गेलाच नाही, तर आपल्यामध्ये कितीतरी पटीने ऊर्जा प्राप्त होऊ शकते. तसंच शरीराचं देखील आहे. दिवसातील काही मिनिटे वेदनेची जाणीवच झाली नाही. तर विचार करा शरीरात किती प्रभावशाली शक्ती तयार होईल. यासाठी आपल्या शारीरिक पीडा कशी होणार नाही हेही आपल्याला समजून घ्यावे लागेल.
ज्यावेळी माझे मन शुद्ध असेल, माझ्या मनात दुष्ट हेतू नसेल, माझ्या मनात अयोग्य विचार येणार नाहीत, माझं बोलणं अयोग्य नसेल आणि मी केलेली कृतीही अयोग्य नसेल त्यावेळी माझं शरीर व्याधीमुक्त झालेलं असेल आणि यातूनच शरीरात एक प्रकारची स्थिरता आलेली असेल. अशी स्थिरता आली तर आपल्या मनात, मनातील विचारांमध्ये परिवर्तनास सुरुवात झाली असे समजावे.
भगवान महावीर म्हणतात, तुम्ही तुमच्या शरीरावर नियंत्रण साधणं गरजेचं आहे. कारण शरीरामधील मन हे निराधार असून त्याला फक्त देहाचा आधार आहे. यासाठी आपला देह कसा हवा, तर वेदना मुक्त आणि व्याधी मुक्त हवा. म्हणजेच आपलं शरीर अंतर्बाह्य शुद्ध होईल. यासाठी आपल्याला त्या दिशेने प्रयत्न देखील करणे गरजेचे आहे. आपला आत्मा हे ईश्वरीय रूप असू शकते. पण आपले शरीर हे शरीरच असतं. आपल्या शरीराला चालण्याचे, बसण्याचे, बोलण्याचे अशा इतरत्र क्रिया करण्याचे प्रशिक्षण अगदी लहानपणापासूनच मिळालेले असते. पण त्या तुलनेने आपला देह आणि आपले मन यांना योग्य ते प्रशिक्षण आपण दिलेले नसते. योग्य शिस्त, योग्य वळण, आणि योग्य प्रशिक्षण याशिवाय शरीर घडत नसतं. शरीर, मन आणि वाणी या सर्वांनाच आवश्यक त्या प्रशिक्षणाची गरज असते. यासाठीच योग्य स्वरूपात देह साधायचा असेल तर ध्यान साधना करणं आवश्यक आहे.





