Pune News | एसटीला लाडक्या बहिणींची साथ; सहा महिन्यात १ कोटी ७८ लाख महिलांचा प्रवास

प्रभात वृत्तसेवा
पुणे – लाडक्या बहिणींसाठी एसटी महिला सन्मान योजनेत महिलांना तिकिट दरात ५० टक्के सवलत देते. याचा गेल्या सहा महिन्यांत (जानेवारी ते जून २०२५) पुणे एसटी विभागातील तब्बल १ कोटी ७८ लाख २१ हजार महिलांनी लाभ घेतला आहे. गतवर्षी याच सहा महिन्यात १ कोटी २९ लाख १४ हजार महिलांनी लाभ घेतला होता. त्यामुळे यंदा महिला प्रवाशी लाभार्थ्यांची संख्या ४९ हजारांनी वाढली आहे.एसटी महामंडळाच्या खिळखिळ्या बस, अस्वच्छता, ऐन सणासुदीतील कर्मचाऱ्यांची आंदोलने आणि करोना आदी कारणाने प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्नातही घट झाली.
प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान असताना सरकारने ७५ वर्षांपुढील नागरिकांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांना ५० टक्के सवलत देणारी महिला सन्मान योजना सुरू केली. मार्च २०२३ मध्ये योजना सुरू झाल्यापासून गाड्यांची संख्या कमी असतानाही महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. परिणामी एसटीच्या ताफ्यात आठ वर्षानंतर नवीन बस दाखल होऊ लागल्या, तसेच ई-बस, वातानूकुलित बस आल्याने प्रवासी संख्याही झपाट्याने वाढली.
प्रवासी संख्या तीन कोटी पार
महिला सन्मान योजनेमुळे जानेवारी ते डिसेंबर २०२४ मध्ये २ कोटी ५८ लाख ६२ हजार ४२ महिलांनी लाभ घेतला. यंदा सहा महिन्यांत हा आकडा पावणेदोन कोटींच्या पुढे गेला आहे. यावर्षी जानेवारीत लाभार्थी संख्या तिप्पट वाढल्याचे दिसते. त्यामुळे यंदा वर्षाअखेर लाभार्थी संख्या ३ कोटीचा टप्पा पार करेल. गेल्या सहा महिन्यांत ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षे ५० टक्के सवलत) योजनेत १३ लाख २९ हजार, तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत (७५ वर्षांपुढे मोफत प्रवास) ३५ लाख १९ हजार जणांनी प्रवास केला आहे.





