ST Corporation deficit: दिवाळी हंगामात एसटी महामंडळाला प्रतिदिन 6 कोटींची तूट; ऑक्टोबरमध्ये 180 कोटींचे नुकसान

मुंबई – राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला यंदा दिवाळीच्या भरघोस हंगामातही अपेक्षित अतिरिक्त उत्पन्न मिळवता आले नाही. दैनंदिन वाहतूक अहवालानुसार, प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात प्रतिदिन तब्बल सहा कोटी रुपयांची मोठी तूट आली असून, केवळ ऑक्टोबर महिन्यातच महामंडळाला सुमारे १८० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.
‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर धावणाऱ्या एसटी महामंडळाला प्रत्यक्षात सातत्याने तोट्याचा सामना करावा लागत आहे. दर महिन्याला आर्थिक चणचण भासत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन देणेही महामंडळाला कठीण होत आहे. त्यामुळे महामंडळाला राज्य सरकारकडून सवलत मूल्यापोटी मिळणाऱ्या निधीवर अवलंबून राहावे लागते.
या वर्षी झालेल्या १४.९५ टक्के भाडेवाढीचा विचार करता, महामंडळाला प्रतिदिन सरासरी ३३ कोटी रुपये उत्पन्न मिळायला हवे होते. परंतु, ऑक्टोबर महिन्यात महामंडळाला केवळ २६.५५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. म्हणजेच, लक्ष्यित केलेल्या रकमेपेक्षा मोठी तूट नोंदवण्यात आली आहे.
निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी –
एसटी महामंडळाचा संचित तोटा आता ११ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचला असून, हा तोटा दरवर्षी वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर, तिकीट विक्रीत सातत्याने घट का होते याचा सखोल अभ्यास करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांचा एक स्वतंत्र गट तातडीने नेमण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले.
बरगे यांनी प्रशासकीय निष्क्रियतेवरही बोट ठेवले. ते म्हणाले, “वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या निष्क्रिय अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी. आवश्यकता भासल्यास, त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.


