Pimpri News : दिवाळीच्या तोंडावर वीजदरवाढ! महावितरण विरोधात पिंपरीत जोरदार आंदोलन

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरवाढ केल्याचा अन्यायकारक निर्णय घेतल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले.याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवाळीच्या तोंडावर महावितरणने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांसाठी प्रति युनिट ३५ पैसे ते ९५ पैसे अशी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, कर्मचाऱ्यांची व शिडी गाड्यांची संख्या कमी असणे, कुठलेही काम करायचे म्हटले की निधी नाही, अशी सबब सांगणे, साधी सर्विस वायर बदलायची असेल तरी ग्राहकाला स्वखर्चातून आणण्यास भाग पाडणे, भार नियंत्रण न झाल्याने विजेची उपकरण खराब होणे, अनेक अपघातांमध्ये नागरिकांचे जखमी होणे आणि मृत्यू होणे असे अनेक गंभीर प्रकार असताना देखील महावितरण दरवाढ थोपत आहे.
महावितरणने केलेली वीज दरवाढ १ ते १०० प्रति युनिट साठी ३५ पैसे, १०१ ते ३०० प्रति युनिट साठी ६५ पैसे, ३०१ ते ५०० प्रति युनिट ८५ पैसे,५०१ पेक्षा जास्त प्रति युनिट ९५ पैसे. अशी दरवाढ याच ऑक्टोबर महिन्याच्या बिलामध्ये होणार आहे. सणासुदीच्या खरेदी सोबत महावितरणची ही दरवाढ सर्व ग्राहकांचे कंबरडे मोडणारी आहे. वीजदरवाढ तातडीने रद्द करण्यात यावी व सर्व वीज ग्राहकांना दिलासा द्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर, मनसेचे
शहर उपाध्यक्ष राजू सावळे, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रविण कदम, जिवन बोऱ्हाडे, काशिनाथ जगताप (राष्ट्रवादी श.प.) अरुण पवार, काँग्रेसचे ज्ञानेश्वर मलशेट्टी, सालार शेख, शिवशंकर उबाळे, सुरेश भिसे, विष्णू बिरादार, रावसाहेब गंगाधरे, सोमनाथ शेळके, अनिल करंदीकर,माधव नेरलेकर, काँग्रेसचे बी बी शिंदे, विशाल भालेराव, दीपक भंडारी, सोनवणे प्रताप, सतीश भोसले, आणि देवराम गोरख, हिरामण खवळे, सर्जेराव पाटील, नारायण बिरादार उपस्थित होते.





