ST Bus for Election : निवडणुकीसाठी ‘लालपरी’ सज्ज! ५३५ एसटी बसमधून होणार मतपेट्यांची वाहतूक
ST Bus for Election : शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील १० आगार मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी सज्ज.

ST Bus for Election – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) ५३५ बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार एसटीकडून बस पुरविण्याची तयारी करण्यात आली आहे. दि. ६ आणि ७ फेब्रुवारी ही बससेवा पुरवली जाणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानासाठी मतपेट्या वाहून नेण्यासाठी प्रत्येकवेळी एसटीकडून बस पुरविण्यात येतात. त्यासाठी निवडणूक नियोजन अधिकारी मतदार केंद्रानुसार एसटी प्रशासनाकडे किती बस लागतील, याची माहिती देतात. त्यानुसार एसटी महामंडळाकडून मतपेट्या वाहून नेण्यासाठी मागणीनुसार बस पुरविल्या जातात.
यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे मतदान दि. ७ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात मतपेट्या वाहून नेण्यासाठी एसटी बस पुरविण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील महत्वाचे शिवाजीनगर, स्वारगेट तसेच पिंपरी-चिंचवड,
एमआयडीसी आगारासह जिल्ह्यातील १० असे एकूण १४ आगारामधून एसटी बस देण्यात आल्या आहेत. तसेच, एखादी बस बंद पडल्यास किंवा अन्य अडचणी आल्यास शिल्लक बस वापरण्यात येणार आहे. त्यासाठी ११३ शिल्लक बस असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.





