प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – पुणे-नगर महामार्गावरून एसटीने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या बॅगेतील एक तोळा वजनाचे सोन्याचे नाणे अज्ञात महिलांनी हातोहात लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा युवराज साळवे (वय ४५, रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) या छत्रपती संभाजीनगर येथून एसटीने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी त्यांचे मौल्यवान साहित्य आणि एक तोळा वजनाचे सोन्याचे नाणे आपल्याजवळील बॅगेत ठेवले होते. बस रांजणगाव येथे आली असता तेथून पाच महिला बसमध्ये चढल्या. त्यातील एक महिला रेखा साळवे यांच्या शेजारी येऊन बसली होती. बस शिक्रापूर परिसरात आली असता, संबंधित महिला बसमधून खाली उतरून निघून गेल्या.काही वेळाने रेखा साळवे यांना आपल्या बॅगेची चैन उघडी असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने बॅगेची पाहणी केली असता, त्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे नाणे चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर साळवे यांनी शिक्रापूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.