मुंबई : एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या म्हणजेच १५० कि.मी.पेक्षा जास्तच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारक (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुटीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. १ जूनला एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटांमध्ये १५ टक्के सूट देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे. आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित एसटीचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत १ जुलै २०२५ रोजी लागू होत आहे. तथापि जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो. ई-शिवनेरीच्या प्रवाशांना लाभ मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित ई-शिवनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा मोबाइल अॅपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना १५ टक्के सवलत प्राप्त करता येऊ शकते.