ST Bus Cancelled : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर अपघात! एसटीच्या १३९ फेऱ्या रद्द; तुमच्या बसचे काय झाले? वाचा
ST Bus Cancelled : टँकर अपघातामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक विस्कळीत; ३७ ई-शिवनेरीसह ६६ इतर बस फेऱ्या एसटी प्रशासनाकडून रद्द.

ST Bus Cancelled – पुणे-मुंबई द्रुगती महामार्गावर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. परिणामी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवा विस्कळीत झाली. या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
त्यामध्ये ३७ ई-शिवनेरी आणि ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश असल्याची माहिती राज्य एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा गेल्या आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाकडून सकाळी आगारातून मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या फेऱ्या रद्द केल्या.
मात्र, त्या आधी सोडण्यात आलेल्या परिवहन विभागाच्या एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. त्यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील सात वाहनांचा समावेश आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल, असे राज्य एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.





