ST Bus Accident: भोर-कापूरहोळ रस्त्यावर एसटी बस दोनशे मीटर रिव्हर्स धावली; पुढे जे घडलं ते थरारक होतं
ST Bus Accident: भोर एसटी आगाराचा भोंगळ कारभार उघड; ४२ पैकी तब्बल ३२ बसेस कालबाह्य झाल्याने प्रवाशांचा आणि शालेय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला.

ST Bus Accident – नादुरुस्त एसटी बस इंजिन दुरुस्तीसाठी टोचन करून भोरहून पुण्याकडे नेत असताना अचानक बसचा पुढील लोखंडी बंपर मधोमध तुटला. यामुळे टोचन निखळल्याने ही एसटी बस तीव्र उतारावरून अंदाजे दोनशे मीटर मागे आली. याच वेळी बसच्या मागे एक ‘मॅक्स’ जीप येत होती; मात्र एसटी चालकाने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानामुळे जीपमधील प्रवाशांसह मोठा अनर्थ टळला.
ही थरारक घटना भोर-कापूरहोळ रस्त्यावरील संगमनेर गावच्या हद्दीत घडली. भोर आगारातील एक नादुरुस्त एसटी बस (एम एच ०६, एस ८९१८) इंजिनच्या कामासाठी दुसऱ्या एसटी बसला टोचन करून पुण्याच्या दापोडी वर्कशॉपकडे नेली जात होती. दोन्ही बसेस नेकलेस पॉईंटजवळून एका तीव्र चढावरून जात असताना, पाठीमागील नादुरुस्त बसचा बंपर अचानक तुटला आणि बस वेगाने उताराच्या दिशेने मागे जाऊ लागली.
भोर आगारात ३२ बसेस कालबाह्य
भोर एसटी आगारात एकूण ४२ बसेस उपलब्ध असून, त्यातील तब्बल ३२ बसेस कालबाह्य झाल्या आहेत; तर केवळ १० बसेस नवीन आहेत. कालबाह्य झालेल्या बसेसनी १० लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला असून, त्या अत्यंत धोकादायक बनल्या आहेत. भोर तालुका डोंगराळ भागाचा असल्याने या खिळखिळ्या झालेल्या बसेस वारंवार रस्त्यात बंद पडतात. यामुळे प्रवाशांना अनेक किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा बुडवून घरचा मार्ग धरावा लागत आहे.




