Dangerous Turn : कासारवाडीत मृत्यूचा सापळा? ‘या’ धोकादायक वळणामुळे वाहनचालक त्रस्त
Dangerous Turn : नाशिक फाटा उड्डाणपुलाखाली अर्धवट रस्ता, उघड्या विद्युत केबल्स आणि सिमेंट ठोकळ्यांमुळे वाहनचालकांचा खोळंबा; तातडीने उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी.

Dangerous Turn : कासारवाडी रेल्वे स्थानक परिसरातून महादेव मंदिर येथील भुयारी मार्गाकडे जाणारा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. नाशिक फाटा उड्डाणपुलाखालून पुढे लोखंडी कमानीतून जाताना रस्त्याच्या मध्यभागी विद्युत केबल, अर्धवट सोडलेले सिमेंट काँक्रीटचे काम आणि पडून असलेले सिमेंट ठोकळे यामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होत आहे.
या मार्गावरून रोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्यावरील धोकादायक स्थितीमुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावे लागत आहेत. विशेषतः या परिसरात प्रथमच येणाऱ्या वाहनचालकांना वळणाचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. रात्रीच्या वेळी हा धोका अधिक गंभीर बनतो. परिसरात पुरेशा इशारा फलकांचा अभाव आहे.
तसेच रस्त्यावर प्रतिबिंबित होणारे रिफ्लेक्टर किंवा चेतावणी व्यवस्था नसल्याने वाहनचालकांना अडथळे शेवटच्या क्षणी दिसतात. त्यामुळे किरकोळ अपघात होण्याच्या घटनाही घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. लोखंडी कमानीच्या पुढील भागात सिमेंटचे ठोकळे आणि केबल उघड्यावर पडून असल्याने वाहतूक कोंडीतही भर पडत आहे.
काही वाहनचालकांना वाहन वाचवताना दुसऱ्या वाहनांच्या जवळ जावे लागत आहे. त्यामुळे गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, रस्त्यावरील अडथळे हटवावेत, लोखंडी कमानीला रिफ्लेक्टर बसवावेत आणि परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.





