एसटी वेळेत नसल्याने आंदोलन

पानशेतच्या नागरिकांचा महामंडळा विरोधात ठिय्या

वेल्हे- एसटी महामंडाळाच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ पोळे, घोल परिसरातील नागरिकांनी एसटी सेवा वेळेवर सुरू होण्यासाठी पानशेत (ता.वेल्हे) येथे ठिय्या आंदोलन केले.

पोळे, घोल, धामणओहळ परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना एसटीच्या अनियमित वेळेचा काही दिवसांपासून त्रास सहन करावा लागत होता.एसटीच्या नियमीत वेळेत एसटी न येता तीन ते चार तास उशीरा येत असल्याने शाळेतील विद्यार्थी व बाजारासाठी किंवा तालुक्‍याच्या ठिकाणी विविध कागदपत्रे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना घरी परत जाण्यासाठी एसटी स्टॅंडवर तासन तास उपाशी पोटी थांबावे लागत होते. विद्यार्थ्यांचा पूर्ण वेळ प्रवास व एसटीच्या प्रतिक्षेत जात होता.

पोळे, घोल परिसरातील रेडेखिंड, चांदसड, डिगेवस्ती, डांगेखिंड, खानू, फरताड वस्ती, टाकी वस्ती, पिपंळमाळ, हिरवेदांड, सांडवघर, जखनी, तव, भोरदेव या वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना एसटीच्या मुख्य ठिकाणाहून उतरून पाच ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागते. एसटी उशीरा येत असल्याने येथील नागरिकांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.

अनेक वेळा अर्ज, निवेदन देऊनही एसटी महामंडाळाकडून कोणताच प्रतिसाद दिला जात नव्हता. यामुळे त्रस्त होवून येथील नागरिक व विविध संघटनांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य मागण्यांत एसटी स्वारगेटहून 3:30 वाजता सोडणे, डबल ड्युटी वाहन चालक न देता स्वतंत्र देणे, वाहन मार्गस्थ बिघाड होणार नाही याची काळजी घेणे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. एसटी महामंडाळाच्या वतीने एसटी डेपो स्थानक आगार प्रमुख आधाव व स्वाती बेंद्रे यांच्याकडून निवेदेन स्विकारण्यात आले. आंदोलनाची दखल घेत आंदोलकांना लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×