SSC Exam 2026 – खेड तालुक्यात इयत्ता दहावीची शालान्त बोर्ड परीक्षा शनिवारपासून (दि. २०) सुरू होत असून तालुक्यातील १५ परीक्षा केंद्रांवर एकूण ६३७५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेचे नियोजन आणि कस्टोडियनची जबाबदारी राजगुरूनगर येथील महात्मा गांधी विद्यालयाकडे सोपवण्यात आली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अमोल जगंले यांनी दिली आहे. दहावीची परीक्षा ८ मार्चपर्यंत, तर बारावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त वातावरण राहावे यासाठी खेड तहसीलदारांच्या आदेशाने ४ भरारी दक्षता पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यामध्ये निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, महसूल नायब तहसीलदार राम बीजे, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर आणि तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांचा समावेश आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रत्येक केंद्रावर बैठे स्थिर पथक कार्यरत असणार आहे. केंद्रनिहाय विद्यार्थी संख्या महात्मा गांधी विद्यालय, राजगुरूनगर (११००), श्रीभैरवनाथ विद्यामंदिर, पाबळ (३९२), एम.वाय.होळकर विद्यालय, वाफगाव (११६), कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, वाडा (३११), श्रीशिवाजी विद्या मंदिर, चाकण (१०००), जवाहर विद्यालय, चास (२२३), कुंडेश्वर विद्यालय, पाईट (३०२), श्रीशिवाजी विद्यालय, शेलपिंपळगाव (५४८), श्रीवाकेश्वर विद्यालय, पेठ (२११), श्रीशिगेश्वर विद्यालय, कुडे बु. (१४७), रामभाऊ म्हाळगी विद्यालय, कडूस (२५७), नवमहाराष्ट्र विद्यालय, खराबवाडी (४८२), श्रीभामचंद्र माध्यमिक विद्यालय, भांबोली (३४८), के.टी.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूल, राजगुरूनगर (४५६) आणि विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, चाकण (४८२). रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि. २१) इयत्ता ५ वी व ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. इयत्ता ५ वीसाठी ३६ केंद्रांवर ६४१७ विद्यार्थी, तर इयत्ता ८ वीसाठी १३ केंद्रांवर २२३४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एकूण ४९ परीक्षा केंद्रांवर ४११ पर्यवेक्षक आणि ४९ बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली असून परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जगंले यांनी सांगितले.