Satara News : सर्वसाधारण आरक्षणमुळे फलटणमध्ये मोठी चुरस!

फलटण : फलटण नगरपरिषदेसाठी सर्वसाधारण (खुला) आरक्षण पडल्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी पुढे येत आहे.गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी सोडत आज झाली.
यामध्ये फलटण नगराध्यक्षपद खुले आरक्षण झाल्यामुळे फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठी रंगत निर्माण झाली आहे. कारण या निवडणुकीमध्ये विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे येत असून खासदार गटाकडून माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे येत आहे.
फलटण नगर परिषदेची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे. येणाऱ्या काळात नाईक निंबाळकर विरुद्ध नाईक निंबाळकर अशी लढत होण्याची दाट शक्यता मानली जात आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून फलटण तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणाला गेलेले दिसून येत आहे. रामराजे व रणजितदादा यांचा वाद सर्वांना सर्वश्रुत आहे. येणाऱ्या काळात फलटण नगरपरिषदेत अभ्यासू नगराध्यक्ष मिळणार यात शंका नाही.
अनिकेतराजे व समशेरसिंह यांचा अभ्यास असल्याकारणाने त्यांच्या त्यांच्या गटांकडून यांची नावे पुढे येत असून त्यातच भर म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सोशल मीडियावर व्हाट्सॲप स्टेटस ठेवून अनिकेतराजे नाईक निंबाळकर हेच राजे गटाकडून निश्चित उमेदवार असल्याचे जाहीर केले असल्याचे बोलले जात आहे.
समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा फलटण नगर परिषदेमध्ये अनेक वर्षाचा अभ्यास या निवडणुकीमध्ये कामी येणार अशी चर्चा फलटण शहरामध्ये सुरू आहे. येणाऱ्या काळात कोणता नाईक निंबाळकर बाजी मारणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आतापासूनच सुरू झाली आहे.





