श्रीनिवास वनगा अखेर ४ दिवसांनंतर घरी परतले; उमेदवारी नाकारल्याने होते नॉटरिचेबल

Srinivas Vanaga । शिवसेना शिंदे गटाचे पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वानगा यांना उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे ते नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह सर्वजण चिंतेत होते. मात्र मंगळवारी बुधवारी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास आमदार श्रीनिवास वनगा हे आपल्या घरी येऊन पुन्हा माघारी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीकडून देण्यात आली आहे.
अखेर आता श्रीनिवास वनगा तब्बल ४ दिवसानंतर घरी परतले असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा तलासरीतील कवाडे येथील त्यांच्या राहत्या घरी परतले. त्यामुळे कुटुंबीयांना दिलासा मिळाला. पालघर विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने श्रीनिवास वनगा नैराश्येत होते. याबाबत त्यांनी मनातील खदखद प्रसार माध्यमांचा समोर व्यक्त केली.
३६ तासानंतर आले अन्…
मात्र नाराज असलेले वनगा हेआपले दोन्ही मोबाईल बंद करून घरात कोणालाही कल्पना न देता अज्ञातवासात निघून गेले. मात्र तब्बल ३६ तासानंतर पहाटे तीन वाजता श्रीनिवास वनगा घरी येऊन आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटून आपण सुखरूप असल्याची माहिती देत पुन्हा मित्र परिवारासोबत नातेवाईकाकडे निघून गेले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उमेदवारी दिली नसल्याने मी व्यथीत झालो आहे आणि त्यामुळे मला आरामाची गरज आहे, असं सांगून श्रीनिवास वनगा आपल्या काही मित्रांसोबत पुन्हा माघारी गेल्याची माहिती समोर आली होती. परंतु आता चार दिवस बेपत्ता राहिल्यानंतर ते घरी परतले आहेत. दरम्यान, तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा आता यापुढे आपली राजकीय भूमिका काय घेतात हे येत्या काळातच स्पष्ट होऊ शकतं.
हेही वाचा:
हृदयात रक्ताची गुठळी; प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल





