Alandi : श्रीक्षेत्र अलंकापुरी सज्ज
Alandi : शनिवार, दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा भव्य रथोत्सव सोहळा पार पडणार आहे.

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा (कार्तिकी यात्रा) यंदा १ ते ८ डिसेंबरदरम्यान आळंदीत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे. कार्तिक वद्य अष्टमी (मंगळवार, दि. १ डिसेंबर) ते कार्तिक वद्य अमावस्या (मंगळवार, दि. ८ डिसेंबर) या कालावधीत होणाऱ्या यात्रेचे अधिकृत वेळापत्रक आळंदी देवस्थानच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
सोहळ्याची सुरुवात मंगळवार, दि. १ डिसेंबर रोजी वै. श्रीगुरू हैबतरावबाबा यांच्या पायरीपूजनाने होणार आहे. याच दिवशी संत नामदेव महाराज आणि भगवान श्री पांडुरंगांचे पालखी सोहळे आळंदीत दाखल होतील. शुक्रवार, दि. ४ डिसेंबर रोजी कार्तिकी एकादशी साजरी होणार असून, दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या दरम्यान श्रींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी मंदिरातून बाहेर पडणार आहे.
शनिवार, दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा भव्य रथोत्सव सोहळा पार पडणार आहे. यात्रेतील मुख्य दिवस असलेला ७३१ वा संजीवन समाधी सोहळा रविवार, दि. ६ डिसेंबर रोजी भक्तिभावात संपन्न होईल. कार्तिकी यात्रेची सांगता मंगळवार, दि. ८ डिसेंबर रोजी होणार असून, रात्री ९.३० ते १२.३० या वेळेत श्रींची पालखी छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.
संपूर्ण यात्रा कालावधीत श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा आणि परंपरेनुसार भजन, कीर्तन, जागर यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक आळंदीत दाखल होण्याची अपेक्षा असून, देवस्थानच्या वतीने यात्रेचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे.





